मुक्ती नकोच.. मुल्ला व प्रवचन.. भित्रे इमानदार
गुरुवार, १५ जून, २०१७ मुकेश माचकर

बोधकथा, मुल्ला नसरुद्दीन कथा आणि विनोद यांचा सकाळच्या कडक चहासारखा मेंदूला तरतरी देणारा पानीकम डोस खास 'बिगुल'च्या वाचकांसाठी माचकर स्पेशल 'अमृततुल्य'मधून...

ओशो लहान होता, चंद्रमोहन जैन होता, तेव्हा गावातले एक पुजारी त्याला खूप घाबरायचे. तो कृष्णभक्त होता. कृष्णमंदिराचाच पुजारी होता. आडनाव होतं बन्सीवाले. अतिशय सज्जन, देवभोळा आणि सौम्य, ऋजू प्रकृतीचा माणूस. पण, छोटा चंदू समोरून आला की तोंडातल्या मंत्रांची जागा शिव्याशाप घ्यायचे. तो पूजा करत असतानाच हमखास चंदू यायचा आणि बन्सीवाले पूजापाठ विसरून जायचा, हातात जे काही सापडेल ते घेऊन चंदूला हुसकावायचा.

त्याला कारणही तसंच होतं. चंद्रमोहन त्याच्यापाशी जाऊन म्हणायचा, ‘रामनाम सत्य है...’ हे त्याला भयंकर अशुभ वाटायचं.

तो चंदूला ओरडून सांगायचा, दूर हो, माझ्यापाशी येऊ नकोस. हातात जे सापडेल ते फेकून मारीन.

चंदू विचारायचा, पण, का? मी असं काय केलं?

बन्सीवाले त्याचा उच्चार करू शकायचा नाही.

हा छळ खूप असह्य झाला, तेव्हा बन्सीवालेने चंदूच्या वडिलांना गाठलं आणि सांगितलं, तुमचा मुलगा मला फार छळतो, त्याला आवरा.

वडिलांनी चंदूला बोलावून घेतलं.

चंदू म्हणाला, मी काय त्रास देतो, ते त्यांना विचारा.

वडिलांनी विचारलं, बन्सीवालेंना उत्तर देता येईना.

चंदू म्हणाला, विचारा त्यांना. मी त्यांना शिव्या देतो का? अपशब्द बोलतो का? मी त्यांच्या काही खोड्या काढतो का?

बन्सीवालेंनी सगळ्याला नकारदर्शक मान हलवली.

चंदू म्हणाला, विचारा त्यांना, मी त्यांच्यापुढे त्यांना पूज्य आणि प्रिय अशा देवाचंच नाव घेतो ना.

बन्सीवालेंनी याला रुकार दर्शवला.

चंदूचे वडील चकित झाले. ते बन्सीवालेंना म्हणाले, अहो, मग अडचण काय?

अडचण काय ती त्यांना सांगता येईना. त्यांच्याच्याने तो अशुभ उच्चार होईना.

चंदू म्हणाला, कमाल आहे. मी बोलताना घाबरत नाही, तुम्ही उच्चारायला घाबरता. हवं तर माझ्या वडिलांच्या कानात सांगा.

बन्सीवालेंनी कसाबसा धीर एकवटून चंदूच्या वडिलांच्या कानात सांगितलं की तुमचा मुलगा ‘रामनाम सत्य है’ म्हणतो.

चंदू म्हणाला, मला सांगा रामनाम सत्य है, मध्ये वाईट काय? तुमचा पूज्य देव आहे. त्याचं नावच सत्य आहे, असं विधान आहे. ते मेलेल्या माणसाला का ऐकवायचं? आता त्याला उपयोग काय? आता तो हे ऐकून काय करणार? तो तर गेला. त्याला आधी सांगितलं असतं तर बिचारा जीवनमरणाच्या फेऱ्यातून सुटला तरी असता. तो मेल्यावर आत्म्याच्या रूपात हे ऐकून नंतर मुक्त होणार असेल, तर जिवंतपणीच हे का ऐकायचं नाही? यात अशुभ काय आहे?

बन्सीवाले म्हणाले, मी इतक्या लोकांना पोहोचवलं, इतक्यांदा रामनाम सत्य है म्हणालो, पण हे सगळे विचार माझ्या डोक्यात नाही आले. जिवंतपणी माणसाला मुक्त व्हायचंच नसतं बहुतेक, म्हणूनच तो मेल्यानंतर, आता अनायसे मेलाच आहे तर मुक्तही होऊन जाऊदेत, म्हणून लोक तेव्हाच देवाचं नाव त्याला ऐकवत असतील.

........................................

मुल्ला नसरुद्दीनला प्रवचनांची प्रचंड नफरत होती. त्यामुळेच त्याला प्रवचनाला हजर राहिलेला पाहून प्रवचनकार चपापले. त्यामुळे की काय, प्रवचनाचा सगळा तोल बिघडला. प्रवचनकार बोलत राहिले, वेळ मारून नेत राहिले, श्रोते जांभया देत, डुलक्या खात सौजन्याने बसून राहिले; पण, हे आपल्या कारकीर्दीतलं सगळ्यात वाईट प्रवचन होतं, हे त्यांना माहिती होतं.

प्रवचनानंतर कोणाकडेही न पाहता प्रवचनकार झटपट निघाले, तेव्हा मुल्लाने त्यांना अडवलं. मुल्ला भयंकर खूष दिसत होता. तोंडभरून हसत प्रवचनकारांच्या पाठीवर थाप मारून मुल्ला म्हणाला, मी बेहद्द खूष झालो तुमच्या प्रवचनामुळे. मला आजवर सगळ्यात जास्त आवडलं हे तुमचं प्रवचन.

प्रवचनकार चक्रावले. म्हणाले, काय आवडलं तुम्हाला त्यात?

मुल्ला म्हणाला, प्रवचनं हा एक नंबर भंपक आणि बंडल प्रकार असतो, हे माझं ठाम मत आहे. त्या मताला तुमच्या प्रवचनाने आज बळकटीच दिली. ते अत्यंत रद्दड आणि टाकाऊ होतं, म्हणूनच मला ते खूप आवडलं!!!!

.................................................   

बेईमान माणसाची बघा कशी भरभराट होते जगात,

असं विषादाने सांगणारा माणूस इमानदार नसतो…

तोही आतून बेईमानच असतो, फक्त धाडसात कमी पडतो!

…………………………..प्रतिक्रिया द्या8868 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर