श्रद्धेचा शॉर्टकट आणि शॉर्टसर्किट
गुरुवार, १५ जून, २०१७ सविता कु-हाडे

ज्ञानार्जनाच्या मार्गात श्रद्धा नावाचा शॉर्टकट शोधू बघणा-यांच्या बुद्धीप्रामाण्याचं हमसखास शॉर्टसर्किट होतं. तरीही बुद्धीचा वापर न करता रिती-भातींचे अनुसरण करणारे आजूबाजूला दिसतात.

“श्रद्धा हा ज्ञानाचा शॉर्टकट म्हणून मान्य केला की बुद्धीप्रामाण्याचं शॉर्टसर्किट होतं.”

- आयन रॅन्ड, अॅटलास श्रग्ड.

“The alleged short-cut to knowledge, which is faith, is only a short-circuit destroying the mind.” -Ayn Rand, Atlas Shrugged

मानवाच्या उत्क्रांतीच्या काळात समूहात जगताना माणसाच्या आयुष्याला नियमांनी बांधून ठेवण्यासाठीची नियमावली म्हणून धर्म अस्तित्वात आला असावा. हे नियम काटेकोररित्या पाळले जावेत यासाठी प्रत्येक धर्मात अनेक रुढी, परंपरा, चालीरिती घट्ट रूजून बसल्या असाव्यात. माणूस ते पिढ्यानं पिढ्या पाळत आला.

आजच्या विज्ञानयुगात, जिथे वैज्ञानिक विचारांशी सुसंगत नसणा-या गोष्टींची आपण चिकित्सा करावयास हवी, असे का करावे हे प्रश विचारले जावयास हवेत, त्याऐवजी आपण काय करतो? धर्मात, धर्मशास्रात लिहीले आहे म्हणून त्याची चिकित्सा न करताच डोळ्यावर पट्टी ठेऊन या सर्व गोष्टी पाळत असतो.

जसे की माझी आई किंवा सासू अमक्या दिवसाचा उपवास करते मग ते करत राहायला हवे म्हणून तो सुरू करणे, व्रतवैकल्ये करणे, संकट आले देवाला नवस बोलणे, काही ना काही प्राप्त करण्यासाठी होमहवन करणे, काही चुकीचे केले तर देवांचा कोप होईल असा समज करून घेणे, काळी जादू, भूतबाधा, मांत्रिक, भगत, भानामती, प्लँचेट यावर विश्वास ठेवणे, जन्मपत्रिका, कुंडली, ग्रहांची स्थिती, त्यांना शांत करण्यासाठी होम करणे, नासिक-त्र्यंबकेश्वरला जाऊन कालसर्पयोगाची शांती करणे, गंडे, दोरे, ताईत इ. यांनी आपल्यावरील संकटांचे निवारण होईल असा विश्वास ठेवणे, शकुन- अपशकुन, शुभ-अशुभ, पाप-पुण्य, वास्तुदोष दूर करण्यासाठी पूजा, घरात बदल करणे, नशिबात लिहून ठेवले आहे तसेच होईल असा समज करून घेणे तसेच मासिक पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र समजणे, तिला मंदिरत प्रवेश नाकारणे, मनुष्याला देवाचा अवतार/अंश मानून त्याची आराधना करणे या व अशा अनेक गोष्टी केल्या जातात.

आपल्या जवळच्या लोकांच्या भावना दुखावू नयेत, आपल्या संस्कृतीचा, लहानपणापासून मनावर केलेल्या संस्काराचा भाग, सगळयांपासून वेगळे पडू या व अशा अनेक कारणांमुळे आपल्याला पटत नसलेल्या धर्म, रूढी परंपरा वा सण उत्सव अशा अनेक आपण गोष्टी करत असतो. आपण श्रध्दाळू, संस्कारक्षम आहोत हे जणू काही ही व्रतवैकल्ये, कर्मकांड केल्याशिवाय सिद्ध होऊ शकत नाही.
अनेक वेळा लोकांच्या श्रद्धा वा भक्ती ही काही मागण्यासाठी किंवा मला काही मिळावे या हेतूने प्रेरित दिसतात. जीवनातील अगतिकता, असुरक्षितता, अहंकार, भीती, पूर्व संस्कार, याबरोबरच व्यक्तीला कुटुंबात, समाजात व्यावहारिक, धार्मिक गोष्टींमध्ये मोठेपणा हवा असतो.

आपल्या धार्मिक श्रध्दा, अध्यात्म ही खरं तर आपली खासगी बाब असावयास हवी. पण आपली धार्मिक श्रद्धा सार्वजनिक करण्याची प्रवृत्ती अंधश्रद्धा पसरवायला मदत करत असते. माणूस हा तर्कसंगत विचार करणारा जीव आहे पण असे दिसते की काही जणांना या विचारांपासूनच सुटका हवी असते. वास्तवाला भिडण्याचे सामर्थ्य नसणारे असे लोक मग पोकळ कोपरे शोधत फिरतात आधारासाठी. लोकांना सगळं सोपे, आयतं हवं असत.

मग त्यासाठी कुणाच्या ना कुणाच्या आधाराची, मार्गदर्शनाची गरज लागते. अशावेळेस मग आपल्यासाठी कोणी विचार करणारा, जीवनाचा मार्ग दाखवणारा, संकटं दूर करणा-यावर आपले भवितव्य सोपवावेसे वाटते. मनाचा दुबळेपणा कवटाळून, धर्माचा बाजार मांडणा-यांना साथ देण्यात कमीपणा वाटत नाही. काहीजणं पूर्णपणे तर काहीजणं अंशतः तर काही संकट आले की बुवा, बाबा, बापू, आई, माँ, महाराज यांना शरण जातात.

मला वाटते आपण आपल्या आयुष्याकडे किंवा जगाकडे आपापल्या धर्माच्या चष्म्यातून बघितले की तेव्हढेच आपण बघतो जो आपला धर्म, त्यातील धर्मपंडित, गुरू आपल्याला दाखवू इच्छितात. झापड लावलेल्या घोड्यासारखी काहीशी ही अवस्था होऊन बसते.

श्रद्धेचा निकष ज्ञान असावा. कोणत्याही श्रद्धेच्या आहारी जाण्याऐवजी स्वबुद्धी वापरावी, विचार करावा, चिकित्सा करावी, आपला अनुभव काय ते तपासावे. आपल्या स्वत:च्या विचारातून केलेल्या अगदी छोट्यातल्या छोट्या कामाचाही आनंद वेगळाच असतो. यासाठी कुणा द्ुस-यावर, त्यांच्या अपेक्षांवर अवलंबून राहायची गरज लागत नाही. आपले बौद्धिक शहाणपण द्ुस-याकडे गहाण ठेऊन जीवनाचे प्रश्न सुटत नसतात. दैववादाच्या मागे लागण्याऐवजी प्रयत्नवादच आपले जीवन सार्थ करण्याचा उपाय आहे यावर आपण ठाम असावयास हवे.

घटनेने देखील चौकस बुद्धी वाढवणे, शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणे ही नागरिकाची प्रमुख कर्तव्ये म्हणून दिली आहेत. जीवनात येणा-या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्याचा सामना करण्यासाठी आत्मविश्वास विकसित होणे गरजेचे आहे. कुटुंबात, समाजात, शिक्षणप्रणालीमध्ये मुलांना लहानपणापासून तर्कसंगत विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. माणूस हाच केंद्रबिंदू धरून माणुसकीचा पाठपुरावा होणे गरेजेचे आहे.

संतपरंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील संतांनी धर्मांधपणातील अंधश्रद्धांचा नेहमीच कडक समाचार घेतला आहे. उदारणार्थ चोखामेळांचा हा अभंग –
“माकडाचे परि हालविती मान। दावी थोरपण जगामध्ये।।
स्वहिता मुकले, स्वहिता मुकले। बळी झाकी डोळे नाक धरी।।
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग। डोलविती अंग रंग नाही।।
पोटाचा पोसणा विटंबना करी। भीक दारोदारी मागितले।।
चोखा म्हणे जगामध्ये भोंदू। तया कोण साधू म्हणे देवा।।”

.....

सविता कु-हाडे यांच्या ब्लॉगवर जाण्यासाठी क्लिक करा या लिंकवर http://savitakurhade.wordpress.com
 प्रतिक्रिया द्या1589 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
AJIT JADHAV - गुरुवार, १५ जून, २०१७
I LIKE WRITING AND GOOD MASSAGE MY SISTER

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर