विंग्लिश मिडियम
बुधवार, १४ जून, २०१७ प्रा. सतीश वाघमारे

गरिबांवर उपकार केल्यासारख्या कमी फी घेणा-या इंग्रजी शाळांतलं शिक्षणही गचाळ आहे. त्यापेक्षा मुलांना उत्तम मराठी शिकवावं आणि सावकाश इंग्रजीची तयारी करून घ्यावी हेच योग्य ठरेल.

आमच्या घरी धुणीभांडी करायला येणाऱ्या ताईने तिच्या मुलाला माझ्या ओळखीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला असा हट्ट धरला. मी म्हटले, त्याला मराठी शाळेत घाला ताई. सेमीमध्ये शिकू द्या. तर त्या म्हटल्या, सर, होऊ द्या की तुमच्यावानी साहेब पोरगा. आम्ही अजून कष्ट करू लै कष्ट करू आणि खर्च करून शिकवू. मी त्यांना सांगितले, अहो, या घरातली मुलेसुद्धा सरकारी शाळेत मराठी माध्यमात शिकतात. तुमचे कष्ट, तुमचा पैसा आणि तुमच्या मुलाचे शिक्षण याला न्याय देणाऱ्या इंग्रजी शाळा आपल्या भोवती नाहीत. वाईट अवस्था आहे आणि पोरगं दहावी-बारावीला गेल्यावर नंतरच काय ती खरं असतंय. तोवर शिकवा मराठीतच. तर त्यांनी अजिबात ऐकले नाही . त्यांच्या मुलाचे एडमिशन इंग्लिश मिडियमलाच झाले .

इंग्रजी महत्त्वाची आहे, खूप खूप महत्त्वाची आहे हे आधीच क्लीअर करतो पण म्हणून पहिली दुसरीला असतानाच आपला पोरगा वा पोरगी फडफड इंग्रजीतून बोलले म्हणजे त्यांना लगेच वयाच्या सातव्या आठव्या वर्षीच कलेक्टरचा जॉब मिळेल अशा धारणेतून जे आईबाप (त्यातही खास सुशिक्षित आईबाप ममा पपा डॅडावाले) पोरांच्या शाळा, शिक्षक, ट्युशन, इंग्रजी टॉकिंग आणि एकस्ट्रा अॅक्टिव्हीटीजकडे जगण्यामरण्याच्या समस्येपेक्षा अधिक गंभीर समस्या आहे असे समजून पाहतात ते फार भयानक आहे. बंगला, वनबीएचके, टूबीएचके फ्लॅटमधील रहिवासी असलेल्या  गडगंज श्रीमंत दक्ष आईबाप लोकांच्या एकूणच जगण्या-वागण्यात प्लानिंग असते. त्यांच्या मुलांच्या बौद्धिक-भावनिक विकासावर झालेले बरेवाईट फायदेतोटे याचा त्यांना भविष्यात त्रास जरी झाला तरी ते पालक लोक तो सहजी बेअर करू शकतील तेवढी आर्थिक कुवत धमक त्यांच्यात असते. शिवाय हल्ली सोशल मीडियावर हवे तेव्हा सुस्कारे, निःश्वास टाकून दुखवटा शेअर करण्याची सोय असल्याने, मिळालेल्या लाईक्स व कॉमेंट्समुळे भावनिक बॅलन्सदेखील साधला जाऊन थोड्याच दिवसात इशू काही फार गंभीर वा मोठा न्हवता हं अशी स्वतःवर उत्तम हॅमरिंग करून ते उत्तम जगणेदेखील जगू शकतील. तर त्यामुळे त्या पालकांची फार काळजी करण्याची गरज नाही. तसे ते महत्त्वाचे आहेही आणि म्हटले तर नाहीही. त्यांच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोरगा टॅलंटेड करून सोडायचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या त्यांच्या मुलांच्या भावविश्वाचा व मग त्याच्या भविष्याचा आहे.

दुसरीकडे अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीत गाव खेड्यात राहणाऱ्या अडाणी अशिक्षित अर्धशिक्षित रोजगारी कामगार, छोटे विक्रेते या तळागाळातल्या लोकांच्या इंग्रजी माध्यम, खासगी शाळा, मनपा झेडपीच्या शाळा व इंग्रजी विषय यांच्याकडे बघण्याच्या मानसिकतेचा व यांच्या पोरांच्या भविष्याचा आहे. शहरात खूप इंग्रजी मिडियमच्या शाळा झाल्या आहेत आणि त्या गरिबांना परवडतील असे शुल्क घेऊन चालू आहेत. पंधरा हजार फी वर्षातून तीनचार टप्प्यात भरण्याची सुविधा देऊन तळागाळातल्या गोरगरीब लोकांवर, त्यांच्या पोरांवर इंग्रजी शिकविण्याचे थोर उपकार त्या करत आहेत. जेएन पेटीट, डॉन बॉस्को, बिशप स्कूल, पुनावाला, नगरवाला, सीबीएसईची वातानुकुलीत स्कूल्स वा अजून हायफाय इंग्रजी शाळेत कधीही जाऊ न शकणाऱ्या गोरगरीब पोरांची नवनव्या शिक्षणसम्राटांनी ही सोय केलीय आणि ह्या सोयीच्या ठिकाणी ही गोरगरीबांची मुले अशी इंग्रजी शिकतात का बस्स! आठवीच्या पोराला स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बरोबर लिहिता येत नाही. इतर लिहिणे वाचणे वगैरे तर लांबच. गोरगरीबांसाठी म्हणून असलेल्या अशा बऱ्याच शिक्षण संस्था व शाळा आहेत. त्या शाळांमधील शिक्षकांना कसली ऑर्डर नसते काही नसते. नोकरीतील स्थैर्य, वेतनवाढ, पगारी सुट्ट्या वगैरे मूलभूत लाभांशी त्यांचा कधीच संबंध येत नाही. आठ ते दहा हजार पगार. संस्थेतील मान्यताप्राप्त लोकांशी लाळघोटेपणाचे वर्तन करणे न जमल्यास वर्षभरात लगेच हकालपट्टी. लगेच फ्रेश डीएड, बीएड झालेल्या वीसबावीस वर्षांच्या पोरी घ्यायच्या. पर्याय नसेल तरच एखादा जेन्ट्स शिक्षक. शिक्षिका घेण्यामागचे कारण मुकाट काम करतात हे. बंडखोरी बिलकुल नाही. आता अशा नासक्या वातावरणात कसे काय तिथले शिक्षक या गोरगरीब कष्टकरी रोजगारी मजुरी करणाऱ्या, वेळप्रसंगी उपाशीतापाशी राहून पोटाला चिमटा घेऊन शाळेतल्या वेगवेगळ्या डेजला संस्थाचालक लोकांच्या खात्यात पैशांची भरती करणाऱ्या आईबापांच्या लेकरांना इंग्रजी शिकवीत असतील? त्या व्हॉट्सअप, फेसबुकवर बिझी राहतच या गोरगरीब मुलांना वाघिणीचे दूध पाजायचा प्रामाणिक प्रयत्न करतात. नियमांची खतरनाक पायमल्ली करणाऱ्या एका शिक्षण संस्थेत मी स्वतः काम करतो. (अर्थात सिस्टिमला घोडे लावतच!) तिथे सेम अशीच एक शाळा आहे. कसलेही स्थैर्य नसलेल्या शिक्षक पोरी आणि एक लाडाचा कान्हा असे मिळून ती शाळा चालवतात आणि शिकायला येणारी सर्व पोरे जात आणि संपत्ती दोहोंबाबत तळागाळातल्या वर्गाची. काय आहे या मुलांचे भवितव्य? आठवी-नववीपर्यंत थेट ढकलून पास. घरात इंग्रजीची कसलीच परंपरा नाही. गुडमॉर्निंग, गुडआफ्टरनून म्हणण्यापुरतेसुद्धा टीचरशिवाय आजूबाजूला कोणी नाही. दहावीनंतर म्हणजे दहावी नापासनंतर (कारण आधीच्या खतरनाक पार्श्वभूमीमुळे पुढे तो जिंदगीत दहावी पास होत नसतो) ही पोरे सुद्धा थेट चकचकीत बिल्डिंगमध्ये कामाला लागतात ते तिथल्या कॅन्टिनमध्ये, संडास साफ करायला स्वीपर म्हणून, हॉटेलमध्ये रुमबॉय म्हणून. आयुष्य खलास. अडाणी आईबापांचा मेंदू ढोरकष्टानेच इतका शिणून जातो की पोरगा इंग्लिशमध्ये शिकवूनही साहेब का झाला नाही, हा प्रश्न त्यांना फार वेळ स्वतःत अडकवून ठेवू शकत नाही. पोटाचं कोडं पुढे उभं असतं.

मनमोहनसिंग यांचे सरकार काय वा आताचे हे बारा बोड्याचे सरकार काय कुणीही या असल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतल्या वातावरणावर वचक ठेवलेला नाही. कितीही तक्रारी करा काहीही करा कुठलाही शिक्षण अधिकारी झटून, मागे लागून या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस काही करताना दिसतो असे नाही. असल्या शाळांतून प्रत्येक वर्षाला बहुजन समाजाच्या पिढ्याच्या पिढ्या केवळ इंग्लिश मीडियममध्ये शिक्तायेत या कौतुकाखाली निव्वळ नासवल्या जात आहेत .

इंग्रजी महत्त्वाची आहे. परंतु दुर्दैवाने गोरगरीब मुलांना ही महत्त्वाची इंग्रजी शिकविणारी शिक्षणव्यवस्था गचाळ आहे . तिथे मुलगा इंग्रजी तर शिकत नाहीच धड मराठीही नीट शिकू शकत नाही. लहानपणापासूनच शिक्षणाचं भयंकर त्रांगडं झालेली, टीव्हीत आणि बापाच्या मोबाईलमध्ये अडकलेली लहान लहान मुलं वाढत चाललीत. त्यापेक्षा सरळ मराठी माध्यमात त्यांना शिकू द्या. दहावी बारावीपर्यंत पाहिजे तसे उंडारू द्या. तसेही मनाची संवेदनशील म्हणून मशागत व्हावी असे कुठले वाचन, कुठले उपक्रम इंग्रजी शाळेत आहेत? इथे मराठीत पोरगा उत्तम बालसाहित्य वाचतो. घरादारात मराठी असल्याने भावभावना शेअर करू शकतो. सशक्त तगडं बालपण मनपाच्या झेडपीच्या शाळेतला मुलगा जितका जगतो तितके (वर वर्णन आलेल्या खास गोरगरिबांसाठीच्या) इंग्रजी माध्यमातली शाळेत मुले जगत नाहीत. 

माझ्याजवळ माझ्या भावंडांची मुले आहेत. दोन वर्षे अशा खतरनाक पार्श्वभूमीच्या इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत मुले घातली. सीनिअर, जुनिअर केजी सर्व सोपस्कार पार पाडून इयत्ता दुसरीपर्यंत पोरे पोचली तरी लिहिता वाचता येईना. जुनिअर, सीनिअर केजी मग फर्स्ट, सेकंड स्टॅण्डर्ड अशा चार वर्षात पोरांना फक्त एबीसीडी आणि पाचपर्यंतचा टेबल यापलीकडे काही येईना. त्यांच्या शिक्षिकांना जाऊन डाफरले तर त्या व्हॉट्सअपवरून नजर हटवत मोठ्या मुश्किलीने बोलल्या, क्लास लावा घरी अभ्यास घ्या. त्या शिक्षक मिस लोकांची, हेडबाईची आयमायच काढायचे बाकी ठेवले पण शेवटी हतबल झालो. मी मुले तिथून काढली आणि सरळ मराठी माध्यमात घातली. तिथल्या शिक्षकांना सांगितले, खणखणीत मराठी लिहिता-वाचता यायला पाहिजे. गणित, इतिहास, भूगोल नंतर बघू. इंग्रजी नीट यायलाच हवं अशी वेळ यायला अजून आठदहा वर्षं बाकी आहेत. चिक्कार वेळ आहे, बघू नंतर. आज या घटनेला दोन वर्षं पूर्ण झाली. माझे दोन्ही पुतणे उत्तम मराठी लिहितात, वाचतात. इंग्रजी थोडे कच्चे आहे पण फिकीर नाही, असे त्यांच्या शिक्षकांचे व माझे दोघांचेही मत आहे. या उन्हाळी सुट्टीत तब्बल दीडशे छोटी छोटी गोष्टींची पुस्तके दोन्ही बहीण-भावंडांनी वाचून काढली. प्योर इंग्रजी माध्यमातल्या पोराला बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज शाहू फुले नीट सांगता येणार नाही इतके नीट माझे पुतणे सांगतील. विक्रम-वेताळ, अरेबियन नाईट्सचा एक एक भाग सांगतात. आता सरकारी शाळेत शिकत असल्यामुळे काही संस्कार घेऊन ते वागतात, वावरतात त्याला इलाज नाही, तशी त्याचीही फार अडचण नाही. खेळता खेळता, चिडाचिडीत आयचा दाणा मायचा दाणा अध्येमध्ये सहज ओघात बोलून जातात, एक टोला लगावला की जीभ चावून सॉरी म्हणतात. अजून काय पाहिजे? 'फक यू'ला प्रतिष्ठा असणाऱ्या वातावरणात माझा पुतण्या कुणाला झवण्या म्हटला तर मी फार सीरिअस व्हायचं काही कारण नाही .

इथली बारा बोड्याची सरकारं अन्नाविना मरायला लागलेल्या कुपोषित पोरांचा जिथे विचार करीत नाहीत तिथे गोरगरीब पोरांच्या दर्जेदार इंग्रजीचा कधी करणार? आपणच आपले मार्ग काढावे लागणार. त्यात सध्यातरी सरळ उत्तम मराठी शिकवावे आणि पुढे सावकाश खास एक विषयाचा क्लास म्हणून इंग्रजीची तयारी करून घ्यावी आणि मग जगण्याच्या झटापटीत स्पर्धेत सावकाश उतरवावं. मनसोक्त सशक्त तगडं जिणं जगू देऊनच भारताचं कणखर निब्बर भविष्य ताकदीने उभं राहणार आहे.

 प्रतिक्रिया द्या2752 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
वर्षा पोलेकर - शुक्रवार, १६ जून, २०१७
छानच लेख. माझे आजोबा शिक्षणाच्या बाबतीत फार कडक होते. कसलेही लाड होतील पण अभ्यासाच्या बाबतीत हयगय नाही. त्यामुळे अशिक्षित आजीनेही आई मावशीकडून आणि नंतर आमच्याकडून अभ्यास करून घेतला. पण आजच्या पिढीचं सगळच चिंताजनक वाटतं. मला मनापासून ईच्छा आहे माझ्या मुलीने मराठी माध्यमातून शिकावं. पण तशा दर्जाच्या मराठी शाळा आहेत कुठे? दादरला आहेत पण आधी फक्त नोकरीसाठी करावा लागणारा प्रवास शाळेपासूनच सुरू होणार. मराठी माध्यमाचा पर्याय नसल्यामुळे मी माझ्या मुलीला विंग्रजी माध्यमात घालतेय खरं पण मी एका गोष्टीवर ठाम आहे ते म्हणजे SSC Board. काहीही झालं तरी मला ICSC CBSC Board नकोच. किती ते मुलांना राबवणं...
amol - शुक्रवार, १६ जून, २०१७
Sadetod lekhan aahe... english madhe type karun marathit sangto, tumhi sangtay hi kalachi garaj aahe, palakani shahane hoyla pahije, sahasa mi comment lihane pasant karat nahi, pan tumche vlikhan vachun lihave vatale. chan lihalat. lokani bodh ghyava.

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर