एक जीवनगाणे संपले!
बुधवार, १४ जून, २०१७ कुमार केतकर

पु. ल. देशपांडे हे व्यक्तिमत्व नेमकं काय होतं याचं सांगोपांग दर्शन घडवणारा अग्रलेख ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी पुलंच्या निधनानंतर लिहिला होता. हा अग्रलेख 'बिगुल'च्या वाचकांसाठी...

आपल्या सर्वांच्या जीवनातली अपूर्वाई आता संपली आहे. ज्या आनंदाच्या धबधब्यात आपण इतकी वर्षे न्हाऊन निघालो, तो धबधबा एकदम कोसळायचा थांबला आहे. ज्या एका माणसाने आपल्या कोरड्या मध्यमवर्गीय जीवनात आनंदाच्या बागा फुलवल्या, तो माणूस त्या बागेतून निघून गेला आहे. ज्या बहुरूप्याने अवघ्या महाराष्ट्राला गेली सुमारे ५० वर्षे रिझवले, तो बहुरूपी पडद्याआड गेला आहे. ज्याच्या आवाजाने समस्त मराठी माणूस आपले देहभान विसरून जात असे, तो आवाज आता फक्त ध्वनीफितीतच उरला आहे. ज्याच्या नुसत्या नामस्पर्शाने मनावरील शेवाळे दूर व्हायचे, ती व्यक्ती आता अनंतात विलीन झाली आहे. आचार्य अत्रे यांच्या शब्दांत म्हणायचे तर, अशी व्यक्ती आणि अशी वल्ली गेल्या दहा हजार वर्षांत झाली नव्हती आणि पुढील दहा हजार वर्षांत होणार नाही. एका वेगळ्याच पोरकेपणाच्या भावनेने मन उदास झाले आहे. जणू हे औदासीन्याचे मळभ कधीच जाणार नाही. तसे पुल गेली सात-आठ वर्षे आजारीच होते. पण ते 'आहेत' ही भावना पुरेशी असे. त्यांचे नाटक पाहताना, एखादी ध्वनिफीत ऐकताना, त्यांचे छायाचित्र पाहताना, दूरचित्रवाणीवर त्यांची एखादी चित्रफीत पाहताना, ते प्रत्यक्षात येथे नसले, तरी या सचेतन चराचरात ते आहेत, ही जाणीव म्हणजे एक केवढा तरी भावनिक-सांस्कृतिक आधार होता. आता यापुढे त्यांच्या स्मृतींच्या आधारे मनातल्या बागा फुलवायचा प्रयत्न करावा लागणार आहे. अशी काय विलक्षण जादू होती या माणसात? असा कोणता मोहिनीमंत्र या माणसाने आत्मसात केला होता की, ज्याचे नुसते नाव प्रसन्नतेचा शिडकावा वातावरणात येत असे? आबालवृद्धांच्या जीवनात बहार आणण्याची ही किमया या माणसाने कुठे व कशी मिळवली? तसे पाहिले, तर महाराष्ट्रात नाटककारांचा तुटवडा नाही. विनोदी लेखकही कितीतरी. अभिनयकला अवगत असलेले तर हजारो. बेमालूम नकला करणारेही कमी नाहीत. संगीताची जाण आणि सुरांचे भान असलेले हजारो जण मैफिली जागवत असतात. परंतु पुल म्हणजे एक आनंदोत्सव होता, जगातल्या सर्व उदात्त व चांगल्या गोष्टींना एकाच मैफलीत आणणारा. बालगंधर्व आणि चार्ली चॅप्लिन, रवींद्रनाथ टागोर आणि पी. जी. वुडहाऊस, जी. ए. कुळकर्णी आणि हेमिंग्वे, राम गणेश गडकरी आणि बर्टोल्ड ब्रेश्त अशा सर्वांना आपल्या आनंदयात्रेत सामील करून घेणारा हा यात्रेकरू कशाने झपाटलेला होता? नास्तिकतेवर नितांत श्रद्धा असलेला हा आस्तिक चुकून देवांच्या दरबारात गेलाच, तर तमाम ३३ कोटी देव त्याला 'असा मी असामी'चा प्रयोग करायला भाग पाडतील. देवांना न मानणारा हा आनंदयात्री, रसिकांची ती गर्दी पाहून ताबडतोब त्यांच्यासमोर गाणी म्हणेल, नकला करील; मर्ढेकर-खानोलकर यांच्या कविता म्हणेल, पेटी वाजवेल आणि ते सर्व ३३ कोटी देव आपले देहभान आणि देवत्वही विसरून जातील. स्वर्गलोकात आलेले 'बोअरडम' निमिषार्धात उडून जाईल.

पुरोगाम्यांना पुल देशपांडे उमजले नाहीत आणि प्रतिगाम्यांना तर ते समजण्यापलीकडलेच होते. ते समीक्षकांच्या चिमट्यांमध्ये कधी सापडले नाहीत आणि त्यांच्या दुर्बोध संज्ञांच्या जंगलांमध्ये कधीही अडकले नाहीत. त्यामुळे भले भले समीक्षक अस्वस्थ होत. पुलंच्या अफाट लोकप्रियतेचे रहस्य उलगडू न शकलेले आत्मनिष्ठ-बंडखोर टीकाकार मिशा पिळत वा बोटे मोडत बसलेले असत, तेव्हा पुल कुठेतरी मैफलींचे फड जिंकण्यात दुंद असत. पुलंच्या साहित्य-संकल्पनांमधील सनातनी स्रोत शोधू पाहणा-या पुरोगामी विद्वानांना 'आनंद' ही भावना वर्गातीत असते, हे अजूनही कळलेले नाही. त्याचप्रमाणे धर्म, हिंदुत्व, रूढी-परंपरा याबद्दल अभिनिवेशाने बोलणा-या मार्तंडांना पुलंच्या लेखनातील मूर्तिभंजन आणि आधुनिकतेचा स्रोत कळायचा नाही. पण पुलंचा दबदबाच इतका प्रचंड की ते संस्कृतीरक्षक फारसे काही करू शकायचे नाहीत. पुढे पुढे ब-याच समीक्षकांनी पुलंचा 'नाद'च सोडला. पुल कायमच 'बिनधास्त' असतं. त्यांच्या लोकप्रियतेच्या जवळपासही कोणी जाणे शक्य नसल्यामुळे आपले 'स्थान; हिरावले जाईल, अशी भीती पुलंना नव्हती. विशेष म्हणजे त्या लोकप्रियतेचे ओझे त्यांच्या अंगावर नव्हते. हवेचा दाब आपल्याला कुठे जाणवतो? चारचौघांबरोबर गप्पा मारताना असो वा मोठ्या सभेत भाषण करताना, मैफलीत पेटी वाजवताना असो वा सुनीताबाईंबरोबर कविता सादर करताना, आर. के. लक्ष्मणबरोबर गप्पा मारताना असो वा बाळासाहेब ठाकरेंबरोबर दिलखुलास मस्करी करताना- पुलंची लय एकच असे. आजूबाजूला कोण आहे, हे पाहून त्यांची प्रतिक्रिया ठरत नसे. त्यामुळे त्यांच्यातला मिश्कीलपणा कधी आटत नसे आणि चेहरा व शरीर आक्रसत नसे. त्याचप्रमाणे त्यांची एखादी कोटी वा विनोद जिव्हारी लागेल, अशी भीती त्यांच्या जवळ बसलेल्यांना वाटत नसे. अनेक विनोदी लेखकांच्या शब्दांमधून जसे रक्त निघते, तसे पुलंच्या लिहिण्या-बोलण्यातून होत नसे. त्यांनी केलेल्या नर्म गुदगुल्यांमुळे एकूण वातावरणातच आनंद बरसत असेल. म्हणूनच पुलंना पी. जी. वुडहाऊस बेहद्द आवडत असे. वुडहाऊसच्या निधनाची बातमी कळल्यावर पुल मनातल्या मनात म्हणाले, “आय थॉट ही वॉज इम्मॉर्टल"- वुडहाऊस तर अमर आहे! नेमकी हीच भावना पुलंच्या लक्षावधी चाहत्यांच्या मनात आज उमचत असेल. पुंलनी वुडहाऊसबद्दल लिहिताना म्हटले आहे, “वुडहाऊस हे एक व्यसन आहे... वुडहाऊस आवडतो म्हणजे अथपासून इतिपर्यंत आवडतो. हे आपल्या बालगंधर्वांच्या गाण्यासारखे आहे. ते संपूर्णच आवडायचे असते. असा व्यसनांनी न बिघडता ज्यांना राहायचे असेल, त्यांनी अवश्य तसे राहावे. अमुकच एका तत्त्वज्ञानात किंवा धर्मानात मावनतचे कल्याण आहे, असा आग्रह धरणा-यांनी या भानगडीत पडू नये. (ते पडत नसतातच!) त्यांच्या हसण्याच्या इंद्रियावर निसर्गानेच एक न उघडणारे झापड बसवलेले असते. अहंकाराची दुर्गंधी आणि अकारण वैताग घेऊन ही माणसे जगत असतात... कुठल्याही तत्त्वज्ञानाचा प्रसार किंवा धिक्कार करण्यासाठी वुडहाऊसने लिलिले नाही. जीवनाच्या सखोस तत्त्वज्ञानाची चिंता केली नाही... विनोदी लेखन हा त्याचा स्वधर्म होता. तो त्याने निष्ठेने पाळला.” पुलंनी वुडहाऊसचे केलेले वर्णन हे त्यांनाही तंतोतंत लागू आहे. पुलंच्या अशा स्वभावाचा, वागण्याचा, खट्याळपणाचा काहींना राग येत असे. या माणसाला काही पोच, खोली, गांभीर्याचे भान आहे की नाही, असे काही गंभीर प्रकृतीची माणसे विचारीत. पुल मराठी मध्यमवर्गीयांचे संवेदनाविश्व ओलांडू शकले नाहीत, अशी टाकी करणारेही होते. जणू काही इतर मराठी साहित्यिक अवघ्या विश्वाला गवसणी घालत होते. या टीकाकारांची फडी तरी मध्यमवर्गीय कुंपण कुठे ओलांडून जात होती? परंतु प्रत्येक गोष्ट बुद्धिवादी चिमटीत पकडून तिच्या सूक्ष्मात शिरू पाङणारे हे समीक्षक, निखळ आनंद असा चिमटीत पकडताच येत नाही, हे समजू शकत नव्हते. सुदैवाने रसिक मराठी माणसाने पुलंच्या अशा टीकाकारांना संस्कृतीच्या कोप-यात केव्हाच झटकून टाकले होते. त्यामुळे पुलंचा आनंदरथ निर्वेधपणे मराठी संस्कृतीच्या महामार्गावरून चालत राहिला.

मराठी जीवनाचा मसावि

पुल या आनंदरथावर अगदी बालपणीच आरूढ झाले होते. गाण्याची, नाटकांची साहित्याची आवड असलेले आई-वडील आणि अगदी साध्यासुध्या वातावरणातील मध्यमवर्गीय कौटुंबिक परिसर. अगदी सुरुवातीला जोगेश्वरी आणि नंतर विलेपार्ले. त्या वेळचे विलेपार्ले म्हणजे मुंबई शहरात वसलेले एक कोकणचे खेडे. त्यांच्यात शब्दात सांगायचे तर, 'पार्ले हे एकेकाळचे छोटे कुटुंब होते. जोश्यांच्या बब्याची मुंज झाली, तर नामा सुतारापासून खुशालशेटजींपर्यंत सगळ्यांना घरचे कार्य उभे राहिल्याचा आनंद होता. गावात खाणावळ चांगली चालू शकत नव्हती. कोणीही कोण्याच्या घरी जावे. ते घर त्याला परके नव्हते... त्या वेळी प्रत्येकाची कुठे तरी श्रद्धा होती. कशाला तरी आपल्या निष्टा जोडलेल्या होत्या. छोटेसे टिळक मंदिर. रात्री चर्चसारखी घंटा वाजली की, मंडळी व्याख्यान-पुराणाला घरात जगल्यासारखी अगत्याने जमत... दादासाहेब पारधी, चांदीवाले परांजपे, माझे आजोबा , असली त्या घरातली कर्ती माणसे. त्यांच्या शब्दावर पार्ल्याने चालावे... गावातल्या कुठल्याही चुकणा-या मुलाचा कान या वडीलधा-या मंडळींनी आजोबाच्या अधिकाराने उपटावा. कुठल्याची मुलाच्या पाठीवर कौतुकाचा हात फिरवायला या मंडळींनी पुढे यावे, आपल्या ब-यावाईट कृत्याने पार्ल्याला खाली पाहावे लागेल, ही भावना लहानपणापासून आमच्या मनात रुजलेली!' पुलंनी त्या पार्ल्याचे नाव नुसते उज्ज्वलच केले नाही, तर अवघ्या पार्लेकरांना अभिमानाचे एक बिरुद दिले. पुलंच्या साहित्यातील सर्व पात्रे गावदेवी, गिरगाव, जोगेश्वरी आणि विलेपार्ल्यातील आहेत. त्यांचे हावभाव, हेल, पेहराव, वागण्याच्या रितीभाती, आवडीनिवडी असे सर्वकाही त्या कौटुंबिक-सामूहिक जीवनातून टिपले आहे. तसे 'कम्युनिटी' जीवन आता मुंबईतून हद्दपार झाले आहे. त्याचबरोबर मराठी संस्कृती. त्यामुळे पुलंचा 'नॉस्टॅल्जिआ' हा समस्त मराठी मुंबईकरांचा आहे. म्हणूनच लंडन, लॉस एंजेलिस, न्यूजर्सी, न्यूयॉर्कमधल्या मराठी माणसांनाही पुल आणि त्यांचा 'नॉस्टॅल्जिआ' मुळापासून हलवून टाकतो. पुल हे अवघ्या मराठी जीवनाचे 'मसावि' होते. ज्या शास्त्रीय संगीताने व त्यावर आधारलेल्या नाट्यसंगीताने मराठी संस्कृतीवर एक शतकाहून अधिक काळ अधिराज्य केले, ते संगीत हा त्यांच्या जीवनाचा प्राण होता. शब्द आणि स्वर व त्याचबरोबर भावभावनाही लोकांपर्यंत कशा न्यायच्या, याचे उपजत ज्ञान त्यांना असावे. त्यांनी ज्या गीतांना स्वरबद्ध केले आहे, त्यातील शब्द आणि सूर कोणाच्याही जिभेवर आणि गळ्यात अगदी लीलया येतात. ते स्वत:च एक 'मल्टि-मीडिया' होते. सध्याच्या संगणकविश्वातील 'मल्टि-मीडिया' पुलंशी स्पर्धा करू शकला नसता. त्यांच्या 'गुळाचा गणपती'मध्ये सबकुछ पुलच होते. कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत, दिग्दर्शन आणि नायकाची भूमिकाही. असा 'मल्टि-मीडिया' प्रयोग आचार्य अत्र्यांनीही केला नव्हता. अत्रे गीते लिहीत, पण संगीत दिग्दर्शक आणि प्रत्यक्ष गाणी म्हणण्याच्या फंदात ते (सुदैवाने) पडले नाहीत. पुल राजकारणात पडले नाहीत आणि अत्रे संगीतसृष्टीत! नाही म्हणायला पुलंनी आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत प्रचाराचे फड गाजवले, पण जयप्रकाशप्रणीत जनता प्रयोग विस्कटून बंद पाडल्यानंतर १९८०च्या निवडणुकीत मात्र ते उतरले नाहीत. पुन्हा कशाला अपेक्षाभंगाने व प्रतारणेने मन पोळून घ्या, असेही त्यांना वाटले असेल!

लाडकेपणाचे रहस्य

पुलंचा जीव राजकारणात रमूच शकला नसता. त्यांच्या मनाचा ओढा त्यांच्याच 'तुझे आहे तुजपाशी' नाटकातील काकाजींच्या वृत्तीकडे होता. स्वानंद आणि आत्मक्लेश या दोन वृत्ती म्हणून त्या नाटकात साकारतात. पुलंनी हे नाटक लिहिले, तेव्हा त्या आत्मक्लेशामागचे तत्त्वज्ञान लोपलेले होते. उरला होता फक्त सांगाडा. चेतनाहिन पण करुणा निर्माण करणारा. आचार्यांची चेष्टा-टिंगल करून पुलंनी काकाजींच्या चंगळवादी जीवनशैलीचे कोडकौतुकच नव्हे, तर उदात्तीकरणही केले, अशी टीका तेव्हा झाली होती. वस्तुत: त्या दोन तत्त्वज्ञानांमधला संघर्ष त्यांना दाखवयाचाच नव्हता. त्यांना अभिप्रेत होता दोन वृत्तींमधला संघर्ष. म्हणूनच शेवटी काकाजी म्हणातात, 'अरे, काय सांगू यार, त्या सूतकताईतही बडा मझा असतो.' गंमत म्हणजे करुणेचा, प्रेमाचा संदेश देणारे आचार्य इतरांशी आणि स्वत:शी कठोर होत जातात आणि मजेचा, ऐहिकतेचा, आत्ममश्गुलतेचा विचार मांडणारे काकाजी आचार्यांकडे आस्थेने आणि करुणेने पाहू लागतात. निखळ आनंदाची सर्वत्र बरसात करू राहणा-या पुलंना राजकारण मानवले नसते ते त्यामुळेच. त्यांना कदाचित असेही वाटत असावे की, माणूस संगीतात रमला, मैफलीत धुंद झाला आणि आनंदात डुंबला की, त्याच्यातील अपप्रवृत्तींचा आपसूकच लोप होईल. मग राजकाणाची गरजच उरणार नाही; कारण हितसंबंधांनी उभे केलेल लोखंडी गज उन्मळून पडतील. राजकीय विचार म्हणून हा भाबडेपणाच म्हणावा लागेल; परंतु पुल भाबडेच होते आणि त्या भाबडेपणामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांना इतके प्रेम वाटत असे. जीवनाची ऐंशी वर्षे हा भाबडेपणा राहणे, हेच त्यांच्या 'लाडके'पणाचे रहस्य आहे. तो भाबडेपणा 'टिकवण्याचा' प्रयत्न त्यांनी केला नव्हता. तसा केला असता, तर ते अगदीच ओंगळ दिसले असते. ते खरोखरच अंत:करणाने भाबडे होते. त्यांनी लहानपणची एक आठवण लिहिली आहे. “माझे पहिले जाहीर भाषण वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी आमच्या सोसायटीतील सद्‌भक्ती मंदिरात झाले. त्यातील एक आठवण मला पक्की आहे. माझ्या आजोबांनी लिहिलेले वीर अभिमन्यूवरचे भाषण मी चार-पाच मिनिटे धडाधड म्हणून दाखवले, पण शेवट विसरलो. मात्र लगेच प्रसंगावधान राखून 'असो, आता माझी दूध पिण्याची वेळ झाली आहे', असे म्हणून श्रोत्यांच्या चक्रव्यूहातून माझी सुटका करून घेतली. माझ्या या 'दूध पिण्याची वेळ झाली'ची त्यानंतर बराच काळ चेष्टा व कौतुकही होत असे.” हाच त्यांचा भाबडेपणा शेवटपर्यंत टिकला. भाबडा माणूस आग्रही असूच शकत नव्हती. त्यामुळे दुराग्रह, हट्टीपणा, एकारलेपणा, तणतण, चिडचिड असले दुर्गुण स्वभावात येऊच शकत नाहीत. स्वत:वरच खूश होताना, स्वत:च्याच विनोदाला डोळे विस्फारून दाद देताना, स्वत:चं गाणं म्हणताना, त्यावर फिदा होताना त्यांना कधीही संकोच वाटला नाही. आपले जीवनगाणे आपणच, आपल्याच मस्तीत गावे आणि ते म्हणत म्हणत इतरांवरही आनंदाचे गुलाबपाणी शिंपडत जावे, असे पुलंना कायम वाटत असे. ते तसेच जगले. त्यांच्या अशा गुलाबपाण्याच्या शिंपडण्याने मोहरून गेलेले असे हजारो लोक जगभर आहेत. त्या गुलाबपाण्याच्या आठवणी ते सर्वजण इतक्या काळजीपूर्वक जपतात की, त्यांच्याकडील दागदागिन्यांनाही त्या साठवणींचा हेवा वाटावा. पुल जितके स्वत:मध्ये रमत तितक्याच तन्मयतेने इतरांच्या मैफलीतही रमत. म्हणूनच भीमसेन, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी यांच्या समेवत जर पुल असतील, तर त्या मैफलीत हजर असणा-यांना आपण गेल्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केले असणार, असे वाटू लागे. नाही तर हे सुख आपल्या वाटेला आलेच कसे असते? पुलंच्या या स्वच्छंद, बहारदार शैलीला लौकिक जीवनाचे कुंपण मानवलेच नसते. म्हणूनच टेलिव्हिजनसाठी बीबीसीवर प्रशिक्षण घेतलेले असूनही ती प्रतिष्ठेची नोकरी त्यांनी सहज सोडली. नोकरीच्या चौकटीत पुलंना ठेवणे म्हणजे ती जन्मठेपेची शिक्षाच. त्या तुरुंगात ते गेले, पण तेथून जितक्या लवकर पळ काढता येईल तितक्या लवकर ते पळाले. एका शब्दानेही प्रौढी न मिरवता वा कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता, पुलंनी अनेक सांस्कृतिक-सामाजिक संस्थांना लक्षावधी रुपयांची मदत केली. असा महाराष्ट्रात काय, देशातही दुसरा साहित्यिक नसेल की, ज्याने इतक्या सहजतेने अशा संस्थांना आधार दिला. मनात आणले असते, तर ते केव्हाच मर्सिडिज-फार्महाऊस संस्कृतीत जाऊ शकले असते. पण पुलंनी त्यांच्या राहणीचा अस्सल मराठी मध्यमवर्गीय बाज कधीच सोडला नाही. म्हणूनच ते आनंदयात्रा काढू शकले. आता ती आनंदयात्रा संपली आहे. वुडहाऊसच्या निधनानंतर लिहिलेल्या लेखात पुलंनी म्हटले होते, 'त्या दिवशी मी वुडहाऊसचे पुस्तक उघडले. पहिल्या परिच्छेदातच हसू फुटले, पण हसता हसता डोळ्यात पाणी आले, ते पाणी केवळ हसण्यामुळे आले असे मात्र नाही वाटले.' यापुढे तमाम मराठी माणसांच्या मनाची अवस्था अशीच होणार आहे. त्यांचे पुस्तक वाचताना, 'असा मी असामी' वा 'बटाट्याची चाळ'ची ध्वनिफीत ऐकताना, त्यांचा चेहरा टीव्हीवर पाहताना, त्यांची आठवण काढताना डोळ्यात पाणी येईल आणि ते हसण्यामुळेच असेल असे नाही!प्रतिक्रिया द्या6557 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
श्रीकांत कांब्ळे - रविवार, ३ सप्टेंबर, २०१७
खूप छान लेख आहे. पु.ल.च्या विषयीचा मनात असलेला भाव नव्याने पुलकित झाला.
ऊत्तमकूमार जैन - शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७
सर्वोत्तम
गीतांजली रणशूर - बुधवार, १४ जून, २०१७
सुंदर लेख, thank you for sharing!

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर