खरंच गांधीजी चतुर बनिया होते!
बुधवार, १४ जून, २०१७ प्रियदर्शन

महात्मा गांधी निःसंशय चतुर होते. इंग्रजांसारख्या व्यापारी आणि राज्यकर्त्यांशी लढण्याचं धैर्य असलेलं विराट चातुर्य त्यांच्याजवळ होतं. लढाईची मानवी औजारे शोधण्याची प्रयोगशीलताही त्यामध्ये होती.

महात्मा गांधीजींबद्दल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मताबद्दल वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. अमित शहा, त्यांचा राजकीय पक्ष आणि त्यांच्या सगळ्या विचारधारेमध्ये गांधीजींच्याप्रती अवमानकारक आणि द्वेषाच्या भावनेनं भरलेलं बरंच काही आहे. याच विचारधारेनं नथुराम गोडसेला जन्म दिला, त्याला मान्यता देण्याचा प्रयत्न केला आणि आता ती नथुरामचे पुतळे उभारणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी सरसावलेली दिसते. जुन्या काळातले लोक सांगतात की, जेव्हा सारा देश गांधीजींच्या हत्येनंतर शोकसागरात बुडाला होता, तेव्हा ही विचारधारा लाडू वाटत होती.

म्हणूनच महात्मा गांधींना समजून घेण्याची किंवा त्यांचा आदर करण्याची अपेक्षा बाळगणं आपल्यावर आणि अमित शहा यांच्यावरही अन्याय केल्यासारखं होईल. गांधीजींचा आदर करण्याचं ढोंगी कर्मकांड ते नक्की करतील, कारण त्यांनी सगळे प्रयत्न करुनसुद्धा या देशात गांधीजींसाठी एवढा आदर नक्की शिल्लक आहे की, त्यांच्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाचं काम चालू शकत नाही. परंतु अमित शहा यांच्या वक्तव्याला अनेक पैलू आहेत, ज्याद्वारे भारताच्या बहुसंख्यांकवादी राजकारणाची मानसिकता काही मर्यादेपर्यंत समजून घेऊ शकतो.

गांधीजींच्या जातीची आठवण

पहिली गोष्ट म्हणजे अमित शहांचं वक्तव्य सांगतं की, भारतीय राजकारण अजूनपर्यंत जातीवादी वाक्प्रचाराच्या बाहेर येऊ शकलेलं नाही. गांधीजींना चतुर किंवा चलाख म्हणताना अमित शहा यांना गांधीजींना जन्मानं मिळालेल्या जातीची आठवण झाली. त्यांनी कर्तृत्वानं मिळवलेली ती जात नाही आठवली, जिनं गांधीजींना ‘आँधी’ बनवलं. जर गांधीजींची जातच शोधायची असेल तर आपल्या कामामुळं ते अशा लोकांच्या अधिक जवळ पोहोचले, ज्यांना त्यांनी हरिजन ही उपाधी दिली. समाजातल्या मूलभूत परिवर्तनाची ही गांधीवादी भूमिका अमित शहा यांना दिसली नाही आणि त्यांचं ‘बनिया’ असणं दिसलं असेल तर त्याला अमित शहांचा दृष्टीदोष नाही म्हणता येणार. कदाचित अमित शहा आतापर्यंत समजून चालले असतील की, वाण्याकडे (बनिया) जे जन्मजात चातुर्य असतं, ते बाकीच्या जातींकडं नसतं. अस्पृश्य जाती अस्पृश्य असतात, ब्राह्मण पूजेसाठी असतात आणि क्षत्रिय संरक्षणासाठी असंही ते मानत असतील हे स्पष्ट आहे.

तरीसुद्धा, गांधीजींच्या जन्मजात जातीची आठवण देणारे अमित शहा हे काही पहिले व्यक्ती नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर बॅरिस्टर जीना यांनी त्यांना महान हिंदू नेता म्हटलं होतं. अनेक पाकिस्तानी इतिहासकारांनी गांधीजींच्या या ‘बनिया-दृष्टी’ची चर्चा केली आहे. या तऱ्हेनं पाहिलं तर भाजपवाले आणि मुस्लिम लीगवाल्यांचे विचार परस्परांशी अनेकदा कमालीचे जुळतात. देशाच्या स्वातंत्र्यासंदर्भात, देशाच्या नकाशासंदर्भात, धर्माचा वापर करण्यासंदर्भात आणि गांधीजींच्यासंदर्भात ते अगदी एकसारखा विचार करतात.
खरंतर, दस्तुरखुद्द गांधीजी असते तर कदाचित अमित शहा यांच्या वक्तव्यामुळं एवढे व्यथित झाले नसते. जातीच्या बेड्या तोडण्याच्या अथक प्रयत्नांमध्ये आपल्या आतील बनियावृत्ती शोधण्याएवढा मिश्किलपणा त्यांच्यामध्ये नक्कीच होता. कधीतरी गंमती-गंमतीमध्ये ते आपल्याआत एक ‘बनिया’ आहे याची आठवण करून द्यायचे. जर गंभीरपणे पाहिलं तरीसुद्धा त्यांच्याकडं स्वस्त, साधनांचा पूर्ण वापर आणि संचयाचा जो अभ्यास होता, तोसुद्धा प्रचलित अर्थानं त्यांच्या बनियावृत्तीचाच परिणाम म्हणावा लागेल.

सौदागर गांधीजी

या दृष्टिकोनातून गांधीजी संवेदनशील असले तरी अजिबात भावविवश नव्हते. परदेशात गांधीजींच्या साहित्याच्या लिलावाचं अवडंबर माजवणाऱ्या विजय मल्ल्यांसारख्या देशभक्तांना आणि गांधीभक्तांना कदाचित माहित नसेल की, गांधीजी स्वतः आपल्या साहित्याचा लिलाव करायचे. त्यांना ज्या छोट्या छोट्या भेटवस्तू मिळत, त्यांचा लिलाव करून अनेकदा त्यांनी आपल्या उद्दिष्टासाठी पैसे जमा केले आहेत. अशा प्रकारे छोट्यातील छोट्या नुकसानीसाठी ते किती संतापत असत – त्याच्या अनेक आठवणी त्यांच्या समकालीनांजवळ आहेत. अखेरच्या दिवसांत त्यांचा आधार बनलेल्या आभा बेन यांनी लिहिलंय की, एकदा मध्यरात्री बापूंनी त्यांच्याकडं एका खूप झिजलेल्या पेन्सिलीसंदर्भात विचारणा केली, जी त्यांनी कुठंतरी ठेवली होती. आभा बेननी खूप कष्टपूर्वक ती शोधून काढली. जेव्हा त्या पेन्सिल घेऊन बापूंकडं गेल्या तेव्हा त्यांनी ती नीट जपून ठेवायला सांगितली.
परंतु बापू नामक बनियाला कसले सौदे पसंत होते ? याचं एक उत्तर गणित शिकण्यासंदर्भातील त्यांच्या एका मतातून मिळतं. ते म्हणाले की, जर कुणी असा प्रश्न विचारला की दहा पैशाचं सामान बारा पैशांना विकल्यावर तुम्हाला काय मिळेल तर मी म्हणेन की, तुरुंगवास मिळेल. नफेखोरीला ते मनुष्यविरोधी मानायचे.

गोळी घालणारी विचारधारा

महात्मा गांधीजींना चतुर बनिया म्हणणारे अमित शहा कदाचित त्यांच्या या सौदागरीला कधी समजू शकणार नाहीत. देशप्रेम आणि देशद्रोहाच्या चिर-परिचित आणि सपाट श्रेण्या कधी आणि कशा मनुष्यविरोधी बनतात, हेसुद्धा ते समजू शकणार नाहीत. महात्मा गांधी निःसंशय चतुर होते. इंग्रजांसारख्या व्यापारी आणि राज्यकर्त्यांशी लढण्याचं धैर्य असलेलं विराट चातुर्य त्यांच्याजवळ होतं. आणि लढाईची मानवी औजारे शोधण्याची प्रयोगशीलताही त्यामध्ये होती. त्यामध्ये एक मानवी चातुर्य होतं म्हणूनच साधनांच्या पावित्र्यावर साध्याचं पावित्र्य अवलंबून असतं असं ते मानत होते. मशिदीमध्ये गुपचूपपणे मूर्ती ठेवणाऱ्या आणि चाळीस वर्षांनंतर दांडगाई करून ती पाडणाऱ्या विचारधारेला हे चातुर्य  समजू शकणार नाही. ही विचारधारा गांधीजींचा सामनाही करू शकत नाही, म्हणून त्यांना गोळी घालते, नंतर त्यांना गोळी घालणाराचा पुतळा बनवते आणि पुन्हा गांधीजींना चतुर बनिया म्हणते.

संघ ठरला गांधीजींपेक्षा चतुर !

अमित शहांचं एक म्हणणं खरं आहे की, गांधीजी स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचं अस्तित्व शिल्लक ठेवण्याच्या बाजूनं नव्हते. त्यांची कल्पना लोकसेवक संघाची होती, जो त्यांच्या स्वप्नातील रामराज्याला आकार देऊ शकेल. परंतु या रामराज्यातला राम भाजपनं उभा केलाय तसा एकारलेला नसता आणि राज्यसुद्धा आता दिसतंय तेवढं आक्रमक नसतं. खरंतर गांधीजींमध्ये जे काही होतं त्याचं भाजपकडून विकृतीकरण केलं जातंय – हिंद, हिंदू आणि स्वराज – या तिन्हींचा अर्थ ते विचित्र पद्धतीनं बदलायला लागलेत.
हे खरं आहे की संघ परिवार हा गांधीजींच्या एका अपयशाचासुद्धा परिणाम आहे. आपल्या हयातीत जातीयवादाच्या समस्येशी संघर्ष करणारे गांधीजी असं मानत होते की, हिंदू-मुसलमानांना इंग्रज लढवताहेत. इंग्रज निघून गेल्यावर ही लढाई समाप्त होईल. परंतु इंग्रज निघून गेले आणि भांडण शिल्लक राहिलं ते कधी मुस्लिम लीगनं भडकावलं आणि संघ परिवारानं सुरू ठेवलं. या प्रकरणात संघ स्वतःला गांधीजींपेक्षा अधिक चतुर मानू शकतो.
परंतु हे चातुर्य एका मर्यादित काळासाठी सत्ता मिळवू शकतं, जातीयवाद आणि उन्मादी राष्ट्रवादाला चिथावणी देऊ शकतं. परंतु गांधीजींसारखा माणूस नाही बनवू शकत. गांधीजींची आभा पेलू शकेल असा देशही घडवू शकत नाही.
(प्रियदर्शन हे एनडीटीव्ही इंडियाचे सीनिअर एडिटर आणि हिंदीतील ख्यातनाम कवी, समीक्षक आहेत.)प्रतिक्रिया द्या3189 ( कृपया हा मजकूर खाली लिहा )
Sakha nilawar - शनिवार, ७ ऑक्टोबर, २०१७
Great Gandhi Salut to Gandhi

इतर बातम्या

 
 
 
आमची शिफारस
पुलं गेले तेव्हा...
- मुकेश माचकर